अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेला संवाद "अरे काय म्हणतोस"



अभिनेते नाना पाटेकर यांची आगंतुकपणे भेट झाली. नियोजित कार्यक्रमासाठी हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीचा प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर व अभिनेता मकरंद अनासपुरे कराडमध्ये दाखल झाले आणि त्याच वेळी माझी व त्यांची भेट झाली. नामवंत दोन्ही कलावंत कराडमध्ये दाखल झाल्यामुळे कराडकर यांच्यावतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत केले. कराडच्या शासकीय विश्राम ग्रहावर मुक्कामासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे होते. मूळचा बनवडी येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेला गणेश थोरात हा नाम संस्थेचे काम करतो. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची निवास व भोजन व्यवस्था पाहण्याची जबाबदारी गणेश थोरात यांच्याकडे होती. या निमित्ताने गणेश थोरात यांची ओळख झाली.

नाना पाटेकर यांनी एक काळ मराठी रंगभूमीवर अनेक नाटकांमधून भूमिका करून त्या भूमिका गाजल्या आहेत. त्याचबरोबर रंगभूमीनंतर मराठी चित्रपट व हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना भुरळ घातली व नाना पाटेकर यांच्या दमदार संवादाने अनेकांच्या मनामध्ये नाना पाटेकर घर करून राहिला आहे. तर अभिनयाबरोबरच समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त हेतूने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम संस्थेची स्थापना करून समाज कार्याचा श्रीगणेशा केला. वास्तविक पाहता नाम संस्थेमार्फत केले जाणारे समाजकारणाचे काम हे इतरांपेक्षा आगळे-वेगळे आहे. म्हणूनच या दोन मराठी कलावंतांच्या कार्याची व कामाची समाज नोंद घेत आहे.

माझा परममित्र विश्वास शिंदे काही कामानिमित्त पुण्याहून कराडला आला होता. सहजच फेरफटका मारायचा म्हणून आम्ही दोघे कराडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये गेलो होतो. आम्ही दोघे मित्र गप्पा मारण्यात दंग असतानाच दोन गाड्या विश्रामगृहामध्ये दाखल झाल्या. पहिल्या गाडीतून काही तरुण उतरले, दुसऱ्या गाडीतून अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे गाडीतून खाली उतरले. विश्रामगृहावर उपस्थित असणाऱ्या तरुणांनी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे स्वागत केले. प्रख्यात दोन अभिनेते कराडमध्ये आले आहेत. यामुळे मी आणि विश्वास शिंदे दोघे पुढे गेलो, त्यातीलच एक बुके घेऊन दोघांचे कराडमध्ये आपले स्वागत आहे असे म्हटले. दरम्यान पुढे गेल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्याकडे पाहून "अरे काय म्हणतोस" म्हणून मला साद दिली, प्रतिसाद दिला. मी माझी ओळख सांगितली. आणि "अरे वा छान" म्हणून नाना पाटेकर यांनी माझ्या खांद्यावर थाप टाकली. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे नियोजित आरक्षित केलेल्या विश्रामगृहातील कक्षामध्ये गेले.

अभिनेते नाना पाटेकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे भक्त व समर्थन करणारे सच्चा दिल सैनिक होते.कारण यापूर्वी नाना पाटेकर कराडमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी अनेकदा आले होते. दरम्यान यावेळी माजी व नाना पाटेकर यांची कधी भेट झालेली नव्हती. कराडच्या प्रितीसंगम बागेमध्ये काही वर्षापूर्वी शिवसेनेची एक सभा झाली होती. या सभेसाठी शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर व अभिनेते नाना पाटेकर कराडमध्ये आले होते. यावेळी त्यांचे विचार अनेकांनी ऐकलेले आहेत या सभेला मी एक श्रोता म्हणून उपस्थित होतो. सभेतील फटकेबाजीच्या विचाराबरोबरच नाना पाटेकर यांना जवळून पाहण्याचा योग आला होता. या दीर्घकाळानंतर अभिनेते नाना पाटेकर यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. माझ्या दृष्टीने माझा परममित्र विश्वास शिंदे आणि मी दोघांना अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना भेटता आले. हा आमच्या दृष्टीने अनमोल क्षण होता.

"अरे काय म्हणतोस" असे नाना पाटेकर यांनी माझ्याशी संवाद केल्यामुळे विश्वास शिंदे भारावला होता. तुम्हा दोघांची जुनी ओळख आहे. याप्रमाणे नाना पाटेकर यांनी तुझ्याशी संवाद साधला, याचाच अर्थ खरच तुझे इम्प्रेशन पडते असे विश्वास शिंदे म्हणाला. वास्तविक अभिनेते नाना पाटेकर आणि मी देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे भक्त असल्यामुळे कदाचित नकळतपणे दोघांचा ऋणानुबंध जुळून आला असेल व नाना पाटेकर यांनी मला साद, प्रतिसाद दिला असेल. असो एकंदरीत काय तर महाराष्ट्रातील दोन मोठे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे "कराडमध्ये तुमचे स्वागत आहे" हे म्हणून मी त्यांचे स्वागत केले, यातच सर्व काही आले.

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी समाजकार्याचा वसा घेऊन सुरू केलेल्या "नाम" संस्थेद्वारे महाराष्ट्रात सकारात्मक काम सुरू आहे. या कामांमध्ये बनवडी येथील गणेश थोरात हिरिरीने भाग घेत आहे. नेहमी अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत राहत असतो व त्याच्या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो. कराडचे वैशिष्ट्य सातत्याने मी माझ्या लिखाणात सांगत असतो ते असे की, कराड तालुक्यामधील राहणारे नागरिक हे सकारात्मक विचाराने काम करून चांगल्या कामाच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात. असाच एक गणेश थोरात सध्या पुण्यात राहून नाम संस्थेच्या माध्यमातून काम करतो आहे.

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.