अभिनेते नाना पाटेकर यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारबाबत बॉलीवूडचा कृतघ्नपणा
हिंदी - मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच मराठी नाट्य रंगमंचावर आपल्या अभिनयाने गारुड घातलेल्या नाना पाटेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान या अंत्यसंस्कारावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत अनेक मान्यवर कलाकारांनी काम केले यापैकी एक ही कलाकार हजर राहिला नाही ही दुर्दैवी घटना आहे. एक मराठी कलाकार एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळतो आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. मात्र ज्या सहयोगी कलाकारांसोबत त्यांनी काम केले, त्या कलाकारांना नाना पाटेकर यांच्या मातोश्री गेल्याचे दुःख नसावे किंवा वेदना होत नसाव्यात हे माणुसकी नसणारा प्रकार म्हणावा लागेल.
नाना पाटेकर यांचा स्वभाव पाहता ते स्वच्छ, स्पष्ट व तडाखेबंद बोलणारे आहेत. वास्तविक पाहता कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत, असे नाही मात्र चुकीला चुक म्हणत असत. याचा अर्थ इतरांना दुखावण्याचा बहुधा त्यांचा उद्देश नसावा मात्र, जे सहयोगी कलाकारानी त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा ऋणानुबंध दीर्घकाळ आहे. नानांना घडवण्यामध्ये त्यांच्या आईचा महत्त्वाचा वाटा आहे. आई गेल्याचे दुःख काय असते, हे ज्याची आई स्वर्गलोकी जाते त्यांनाच ते समजू शकते. मात्र बॉलिवूडमधील सिनेतारकांना आपल्या सहयोगी कलाकाराला मातृशोक झाला आहे. आपण त्याचे सांत्वन करावे, एवढी संवेदनशीलता नसावी, म्हणजे हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे किंवा मराठी कलावंताला विचारायचे नाही, असा प्रकार असावा असे खेदाने म्हणावेसे वाटते.
वास्तविक पाहता बॉलिवूडचे कलाकार आले नाहीत, म्हणून फारसा फरक पडत नाही. मात्र दुःखाने गहिवरलेल्या आपल्या सहयोगी कलाकाराला मायेचा खांदा मान ठेवण्यासाठी द्यावा, एवढी माणुसकी नसणारे कलाकार बॉलिवूडमध्ये असतील तर नाटकीपणाचा कळसच म्हणावा लागेल. आपल्या अभिनयाने अनेक कलाकारानी अमाप संपत्ती मिळवली, नावलौकिक मिळवला, मात्र आपल्या सहयोगी कलाकाराच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे जर माणुसकी नसेल, तर काय करायचे तुमच्या नावलौकिकाला अथवा तुमच्या अभिनयाला ? असा प्रश्न निर्माण होत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांनी अत्यंत हालअपेष्टा करून नाना पाटेकर यांना सांभाळले, गरिबीचे चटके आपल्या मुलांना बसू नये यासाठी काबाडकष्ट केले. त्यांना सुसंस्कार देण्यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्यच आहे.
आईच्या संस्कारामुळे नाना पाटेकर यांनी, आपल्या अभिनयाच्या जोरावर समाजामध्ये नावलौकिक मिळवला आणि संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल करून आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर समाजामध्ये मान-मरातब मिळवलेला आहे. लहानपणी नाना पाटेकर यांनी झोपडपट्टीमध्ये दिवस काढलेले आहेत. याचा विसर मात्र नाना पाटेकर यांना कधीही झालेला नाही. आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे. त्या परिस्थितीकडे नाना पाटेकर यांनी कधीही पाठ फिरवली नाही. तर आपण जिथून आलो आहोत, तेथील मित्रमंडळींनाही नाना पाटेकर विसरलेले नाहीत, हा नाना पाटेकरांचा मोठेपणा आहे. मात्र झगमगत्या दुनियेत बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या कौशल्यावर अनेक भूमिका साकार करताना नामवंत व प्रतिथयश कलाकाराबरोबर काम करताना नाना पाटेकर यांना कधीही अहंभाव निर्माण झाला नाही. नाना पाटेकर यांनी आपल्या सहयोगी कलाकारांबरोबर नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले आहेत.
अलीकडच्या काळामध्ये नाना पाटेकर समाजकार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. समाजातील दुःखित, गरीब, दलित पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी एक सकारात्मक पाऊल नाना पाटेकर नेहमीच पुढे आहेत.नाना पाटेकर यांच्या मातोश्री निर्मला गजानन पाटेकर यांचे निधना समयी 99 वर्ष वय होते. वाढत्या वयामुळे त्यांना स्मृति भ्रंश झाला होता. पण त्या पुढील व्यक्तीच्या हालचालीवरून कोण आहे ते ओळखायच्या. नाना पाटेकर यांचे वडील टेक्स्टटाईल प्रिंटिंगचा बिझनेस करायचे. त्यामुळे ते मुंबईत राहायचे. तर नाना पाटेकर हे मुराडला आईसोबत राहायचे. नानांना सात बहीण भाऊ होते. पण ५ जणांचे लहानपणीच निधन झालेले. त्यानंतर त्यांच्या आईने नानांचे आणि त्यांच्या मोठ्या भावाचे पालनपोषण केले. नानांना घडवण्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा होता. नानांचे वडील गजानन पाटेकर यांचे नाना २८ वर्षाचे असतानाच निधन झाले होते.
नाना पाटेकर यांचा ही जीवन प्रवास संघर्षमय आहे. ज्यांचे जीवन संघर्षमय असते, त्यांना कोण आले, कोण नाही ! याच्याशी फारसे काही देणेघेणे नाही. मात्र जे बॉलीवूड कलाकार मोठ्या अभिनयाच्या गोष्टी करतात अथवा अभिनयाद्वारे काही व्यक्तीमहत्त्वाच्या भूमिका साकारतात त्यांना आपल्या सहयोगी कलाकाराचे दुःख समजू नये. हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. वास्तविक पाहता नाना पाटेकर यांचा संघर्षमय जीवन पाहण्यापेक्षा, नाना पाटेकर यांच्या आईने जो संघर्षमय वातावरणात आपल्या मुलांना काबाडकष्ट करून वाढविले आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न अशा श्रेष्ठमातेसाठी बॉलिवूड कलाकारांनी हजर राहणे गरजेचे होते. एवढीच माफक अपेक्षा समाजाची होती. बॉलिवूडच्या कलाकारांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त न करता जो प्रकार केला आहे. तो निंदनीय असाच म्हणावा लागेल.
गोरख तावरे, अध्यक्ष
प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा