कोकणच्या प्रवेशद्वारावरील कराडचेेे बसस्थानक सज्ज
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने राखीव निधी ठेवला होता. या निधीमधून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये एसटी स्टँड उभारणीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी दिला होता. गेल्या अनेक वर्षापासून सदर एसटी स्टँड चे बांधकाम सुरू होते. कराड शहरातील हे मध्यवर्ती एसटी स्टँडचे काम पूर्ण झाल्यानंतर सात जानेवारी रोजी कराड एसटी स्टँडचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी अजित शिंदे व त्यांचे बंधू डॉ. शिंदे यांनी आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ चालक - वाहकांच्या निवासासाठी आपल्या स्वखर्चातून व्यवस्था कराड एसटी स्टँडच्या दुमजल्यावर केलेले आहे. याचेही उद्घाटन आज परिवहन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सर्व सोईनियुक्त अत्याधुनिक बसस्थानक शहर व तालुक्यातील प्रवाशांसाठी आता सज्ज झाले आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ही अधिक सुविधा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आहे.
आत्तापर्यंत कराड शहरांमध्ये ज्या ज्या वास्तू निर्माण झाल्या त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच कराड बसस्थानकामुळे आणखी कराडच्या वैभवात भर पडलेली आहे. कराडच्या दृष्टीने शिरपेचात रोवलेला कराड एसटी स्टँड म्हणजे तुरा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या दृष्टीने विकासात्मक कामे व्हावीत, याकरिता अधिकचा निधी कराडसाठी दिला आहे आणि या निधीमधून अनेक वास्तू उभ्या राहिल्या आहेत. प्रशासकीय इमारत व शासकीय विश्रामगृह यांचे उद्घाटन अद्याप बाकी आहे. कराडला जोडणारे सर्व रस्ते प्रशस्त व चौपदरीकरण करण्यात आले आहेत. यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात गतकाळात निधी दिला आहे. आणि हे काम पूर्ण झालेले आहे. कराड एसटी स्टँडचे उद्घाटनमध्ये नव्याने काही गोष्टी समोर आल्या, त्या म्हणजे कराडचे एसटी स्टँड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अशा पद्धतीने न बांधता, शासनाने स्वतःच्या निधीतून कराड एसटी स्टँड बांधलेले आहे. याचा विचार करून विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रात 98 बसस्थानकांचे काम सुरु केले आहे. म्हणजे बांधा-वापरा-हस्तांतरीत करा ही योजना आता शासकीय स्तरावर बंद झाली आहे. आणि शिंदे कुटुंबीयांनी चालक-वाहकांची जी निवास व्यवस्था केलेली आहे.
कराड प्रमाणेच निवास व्यवस्था नवीन निर्माण होणाऱ्या 98 बसस्थानकामध्ये एस टी महामंडळ स्वतःहून निर्माण करीत आहे. असेही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. याचाच अर्थ कराडमधून सुरू झालेले नवीन काम महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले आहे.गतकाळातील आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय आम्हाला घ्यायचे नाही, म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनीच हे काम केलेले आहे अशी जाहीर कबुली द्यायला ही दिवाकर रावते त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ज्यांनी जे काम केले त्याचेच ते श्रेय आहे. असे सांगताना मी शिवसेनेचा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे फुकटचे श्रेय घ्यायचे नाही हा दिवाकर रावते यांचा सडेतोड स्वभाव सर्वांना भावला. यामुळेच गतकाळामध्ये परिवहन विभागाने महाराष्ट्रामध्ये घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत. शिवसेना-भाजप युती काळातील इतर खात्यापेक्षा परिवहन खात्याने अतिशय चांगले व महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. गरीब - गरजू लोकांच्या दृष्टीने व देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दिवाकर रावते यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.
त्याचबरोबर एस टी महामंडळमध्ये काम करणाऱ्या सेवकांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी राज्यातील 113 ठिकाणांच्या बसस्थानकांना संरक्षण भिंती बांधण्यात येत आहेत. 85 प्रवास गृहांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना शिक्षणासाठी बँकेचे कर्ज घ्यावे लागणार नाही, बीन व्याजी पैसे आता महामंडळ देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या खात्यात शैक्षणिक खर्चासाठी म्हणून दर महिन्याला थेट 750 रुपये जमा करण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत शालेय मुलींना प्रवासासाठी मोफत पास महामंडळाकडून देण्यात येत आहे. शिवसेना-भाजप युतीमधील शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेले सर्वसामान्य लोकांसाठी व एसटी महामंडळमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण म्हणता येतील.
कराडचे बसस्थानक तीन एकर जागेमध्ये उभारलेले आहे. बसस्थानकामध्ये एकूण 22 प्लॉट फॉर्म तयार करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे करण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण वाहनतळाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. वाहनतळाचे एकूण क्षेत्र सुमारे ६२ हजार चौरस फूट इतकी आहे. बसस्थानकातील प्रवाशांकरता आरामदायी खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ३३६ आसनांची व्यवस्था यामध्ये आहे. प्रशिक्षणाचे एकूण क्षेत्र १३ हजार ५७२ चौरस फूट इतकी आहे. प्रवाशांकरता व्हीआयपी प्रतिक्षालय स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे. इमारतीच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रवाशांना चौकशीकरिता वाहतूक नियंत्रण कक्ष उद्घोषणा व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्रतिक्षालयामध्ये गर्मीपासून आराम मिळणेकरता पंख्यांची सुविधा करण्यात आलेले आहे. अपंग प्रवाशांना प्रतिक्षालयामध्ये ये -जा करण्याकरता रॅ प स्टील रेलिंग तयार करण्यात आलेले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय इमारतीच्या दुतर्फी करण्यात आलेली आहे. प्रतीक्षालयात आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिला प्रवाशांकरता हिरकणी कक्षाची सोय बसस्थानक इमारतीमध्ये करण्यात आलेले आहे. प्रवाशांकरता उपहारगृह सोय करण्यात आलेली आहे. उपग्रहाचे एकूण क्षेत्र 12038 चौरस फूट इतकी आहे.
कराड शहराची वाढती प्रवासी वाहतूक पाहता सदर एसटी स्टँड अपुरे पडणार आहे. यामुळे बस स्थानक परिसरात असणारे वर्कशॉप इतर ठिकाणी हलवून कराडचे एसटी स्टँड अधिक अद्ययावत करावी अशी मागणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार बाळासाहेब पाटील आमदार आनंदराव पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राजकीय टीकाटिप्पणी न करता व कोणतेही राजकीय चिमटे न घेता परिवहन मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील व कराड शहरासाठी अधिकाधिक सुविधा द्याव्यात अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी केली आहे. पांढरे शुभ्र कपडे घातलेले व्यक्ती बघितला की तो काँग्रेसचा असे समजले जाते. दरम्यान पांढरे शुभ्र कपड्यांप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वच्छ व्यक्तिमत्व व स्वच्छ कारभार केल्याचे कौतुक दिवाकर रावते यांनी केले आहे. सडेतोड व स्पष्ट बोलण्याची खाती दिवाकर रावते यांची असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात असे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवाकर रावते यांच्या संबंधित बोलताना सांगितले. तर कराड एसटी स्टँड व माझा पहिल्यापासून जवळचा संबंध असल्याचे सांगताना श्रीनिवास पाटील यांनी सांगितले की, श्रीनिवास पाटील एसटी स्टँड समोर कराड हा माझा पोस्टातून येणाऱ्या पत्रांवरील पत्ता आहे.
सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे. एकंदरीत कराड एसटी स्टँडच्या नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभाला शिवसेनेचे मंत्री, राष्ट्रवादीचे खासदार व आमदार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते. तरीही राजकीय टिपणी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला हे विशेष. कराड हे राजकीयदृष्ट्या जागृत असणारे शहर आहे. तरीही सर्व पक्षीय नेते कार्यक्रमस्थळी असताना अतिशय उत्साहाने व कोणतेही हेवेदावे अथवा टीकाटिप्पणी न होता एक आगळा वेगळा कार्यक्रम कराडकरांना पहावयास मिळाला. हेच कराडचे वेगळेपण आहे.
कराड वार्तापत्र - गोरख तावरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा