वादळी पावसामुळे जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट ठेवा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

प्रत्येकाने टीमवर्क म्हणून काम करावे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना; कराडला बैठकीत कोरोनाचाही आढावा


             कराड (लक्ष्मीपुत्र) - जिह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत घेतला. त्याचबरोबर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्री वादळाची शक्यता वर्तवली जात असल्याने जिल्हय़ात वादळी पावसासह वादळाची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या जिल्हय़ातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
              येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांत उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक ग्रामीण किशोर धुमाळ, डॉ. संगीता देशमुख, डॉ. शिंदे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, मलकापूरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार उपस्थित होते. 
              परराज्य व जिह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे जिह्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत बाहेरून आलेल्या व्यक्तींना विलगिकरण कक्षात ठेवण्यासंबंधी ग्रामसमित्या सक्रिय आहेत का, तसेच कोरोना फैलाव रोखण्यासाठी  केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा व सद्य परिस्थितीतील बाधित रुगांचा आढावा ना. बाळासाहेब पाटील यांनी घेतला. 
              कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. प्रत्येकाने टीमवर्क म्हणून काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हँडवॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. विलगिकरण कक्षात असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. 
            अरबी समुद्रात चक्री वादळाच्या शक्यतेने वादळी पावसाची तसेच वादळाची शक्यता आहे. रविवारी वादळी पावसाने जिल्हय़ात नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजार, कीटकजन्य आजार वाढतात. त्या अनुषंगाने साथीचे आजार होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.