कराड अर्बन बँकेकडून सेवकांना पाच लाखांच्या विमाछत्राचे कवच

व्यवस्थापन खर्चात कपात करण्याचा निर्णय

अर्बन कुटुंबाने अनेक आदर्श सहकार क्षेत्रासमोर मांडले


           कराड (लक्ष्मीपुत्र) - मार्च २०२० पासून कारोना विषाणूचा संसर्गास भारतामध्ये सुरूवात झाली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून भारतभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले, केवळ अत्यावश्यक सेवासुविधा सुरू होत्या.अत्यावश्यक सेवेत बैंकिंग क्षेत्राचा समावेश होत असल्याने बँकांच्या शाखा अविरत ग्राहक सेवा देत होत्या. बँकिंग क्षेत्रातील सेवकांकडे समाजाला अर्थसंजीवनी देणारे कोरोना योद्धे म्हणून पाहायला हवे. सेवकांचा ग्राहकांशी थेट संपर्क येत असल्याने सेवकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सर्वाधिक शक्यता असते याचा विचार करून कराड अर्बन बँकेने रु.५ लाखाच्या मुदती विम्याचे संरक्षण सर्वच सेवकांना देऊ केले आहे आणि बँकिंग क्षेत्रात एक वेगळा आदर्श स्थापित केला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी दिली.
          त्याचप्रमाणे, भारतभर लागू असणाऱ्या लॉकडाऊनला ७० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला असून या कालावधीत बरेचसे उद्योगधंदे, व्यापार, कार्यालये अशा सर्वच बाबी संपूर्णत: बंद होत्या आणि आजही बंद आहेत. केवळ जीवनावश्यक सेवाच सुरू आहेत. तसे पाहता अर्थचक्र पूर्णपणे थांबलेले आहे. नजीकच्या भविष्यकाळातदेखील याचा विपरित परिणाम प्रत्येकाच्या उत्पन्नावर होणार आहे. याला बँकिंग क्षेत्रही अपवाद असणार नाही. बँकिंग क्षेत्राचा विचार करता व्याज उत्पन्न आणि वसुलीवर याचा निश्चितपणे गंभीर परिणाम होऊ घातला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी हप्ता परतफेडीसाठी सहा महिन्यांचा विश्रांती कालावधी देऊ केला आहे. मार्च २०२१ अखेरच्या बँकेच्या उत्पन्नावर देखील याचा निश्चितपणाने परिणाम होणार आहे.
          कोव्हीडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्यांच्या परिणामांचा साधक बाधक विचार करून बँकेच्या सेवकांनी पुढाकार घेऊन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने सेवक पगार खर्चात बचत करण्याची योजना व्यवस्थापनापुढे मांडून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत स्वतः पेक्षा संस्थाहितास सर्वोच्च प्राधान्य कृतीने देऊन एक वेगळा आदर्श यानिमित्ताने संपूर्ण सहकार क्षेत्रापुढे घालून दिला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाचे स्वागत करताना ही परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा सभा भत्ता न स्वीकारण्याचा निर्णय घेऊन कुटुंब संस्कृतीची वेगळी ओळख समाजाला करून दिली आहे. सेवकांनी आपणहून हा त्याग करुन अर्बन संस्कृतीचा पाया भक्कम असल्याचे निदर्शक आहे.
          सेवकांनी पगार, भत्ते व तद्नुषंगिक खर्च कपातीचे निर्णय स्वत:हून घेतले असून अशा उपायांमधून बँकेच्या खर्चामध्ये जवळपास रु.६ कोटींची बचत प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे सेवक भरती, बढती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीपासूनच कराड अर्बन बँकेचे संचालक आणि सेवक यांच्यात कौटुंबिक ऋणानुबंधाचे वातावरण असल्याने अर्बन कुटुंबाने अनेक आदर्श सहकार क्षेत्रासमोर मांडले आहेत. सेवकवर्गानेदेखील अनेक घटनांतून स्वयंस्फूर्त सहभाग नोंदविला आहे आणि बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी सांगितले.
           मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव म्हणाले, अर्बन कुटुंबाच्या परंपरेला साजेसा असाच हा निर्णय आहे. बँकेची मार्च २०२१ ची आर्थिक परिस्थिती जास्तीत जास्त सक्षम, सुदृढ करण्याच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्मपणे व बारकाईने अभ्यास करून आतापासूनच नियोजन केले असून आव्हानात्मक असणाऱ्या या काळातदेखील बँकेची वाटचाल अपेक्षेनुरूप उत्तम राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.