पाटण मतदारसंघात विकास कामे कमी पडू देणार नाही - शशिकांत शिंदे


                   पाटण (लक्ष्मीपुत्र) - निवडणूकांमध्ये झालेला जय-पराजय स्विकारुन जो नेता जनतेशी, सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ जपतो तोच खरा नेता. विक्रमसिंह पाटणकर दादांनी ही नाळ आजपर्यंत जपली आणि सत्यजितसिंह सुद्धा हेच नातं मोठ्या आपुलकीने जपत आहेत. पाटणकर घराणे आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता येणाऱ्या काळात सत्यजितसिंह यांना आमदार करेल यात शंका नाही. पाटणच्या जनतेने मी म्हणजेच सत्यजितसिंह समजावे. पाटणसाठी विकास कामे कमी पडू देणार नाही,  असे वक्तव्य आ.शशिकांत शिंदे यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना केले.
                नुकतीच शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवड करण्यात आली. जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे आशिर्वाद घेण्यासाठी ते पाटणकर यांच्या शिक्का मेन्शन येथील निवासस्थानी आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, पक्ष संकटात असताना महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक असे अनेक मातब्बर नेते मंडळी पक्ष सोडून जात असताना सत्यजितसिंह आणि विक्रमसिंह पाटणकर दादांनी पवार साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली नाही. पाटणकर घरण्याची पवार साहेबांवर असलेली निष्ठा आणि पवार साहेबांचे पाटणवर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहेच. पाटण मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सत्यजितसिंह यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहीलो आहे आणि यापुढेही कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद सत्यजितसिंह यांच्या पाठीशी आहे. सत्यजितसिंह आणि पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्यावतीने लागेल ती मदत केली जाईल. यापुढे येणारी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचाच विजय झाला पाहिजे या भावनेने सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले. 
               यावेळी सातारा जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार,उपसभापती प्रताप देसाई, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, अध्यक्ष राजाभाऊ काळे,तांबवे-सुपने विभागातील रविंद्र ताटे, शंकरराव पाटील, निवासराव शिंदे, अॅड. विश्वासराव शिंदे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पाटण विधानसभा मतदारसंघ सुभाष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे, पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, अविनाश पाटील, पं. स.सदस्य विलास देशमुख,माजी पंचायत समिती सदस्या सौ. शोभा कदम, पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचीन कुंभार, सचिन जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनामुळे यावेळी मर्यादित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीच उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, आ. शिंदे सारखा निष्ठावंत तरुण नेता पक्षाला लाभला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाग्य आहे. शिंदें सारख्या नेत्यांमुळे पक्षाला बळ मिळाले आहे. आ. शिंदे एक तडफदार आणि आक्रमक नेते आहेत. त्यांचा हा आक्रमकपणा सातारा जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास कामे खेचून आणण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद विसरून नव्याने पक्ष बांधणीच्या कार्याला लागावे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जावा आणि जेथे अन्याय होईल तेथे प्रतिकार करा तरच पक्ष संघटना मजबूत होईल असे त्यांनी सांगितले.
                यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आ. शिंदे यांनी पाटण मतदारसंघाला मंत्रीपदाच्या कार्यकाळापासून नेहमीच ताकद दिली आहे. पाटण मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड होता आणि यापुढेही राहणार आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या राजकीय ताकदी विरोधात लढण्यासाठी सक्षम आहेत. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो आणि यापुढेही राहणार आहे. सध्या पाटणमध्ये सत्तेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना, सामान्य जनतेला दमदाटी करणे, वेठीस धरणे जोरात चालू आहे. आशा प्रकारचे कारभार करणाऱ्यांनी वेळीच थांबावे. निव्वळ राजकीय विरोध म्हणून लोकांच्या पोटावर पाय आणण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. सर्व सामान्य नागरिकांना अडचणीत आणणारे उपद्व्याप करण्यापेक्षा लोकांच्या भल्यासाठी काम करा असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुकीत मी व माझे कार्यकर्ते सर्व ताकदीने पक्षाचे काम करु. विधानसभा निवडणुकीत झालेल्या चूकांमधून बोध घेऊन पुन्हा एकदा पक्षामध्ये चैतन्य निर्माण करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ते पुढे म्हणाले, आ. शिंदेची कामाची पद्धत आम्हीं त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात अनुभवलेली आहे. सर्व सामान्य माणसाला ताकद देणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. नक्कीच पाटण मतदारसंघाला आ. शिंदे बळ देतील यात शंका नाही. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आ. शिदे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वाचे स्वागत राजाभाऊ काळे यांनी केले तर आभार शंकर शेडगे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.