संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या - ना. नरेंद्र पाटील

माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा


              मुंबई (लक्ष्मीपुत्र) - कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि.२९ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी, माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांचेकडे निवेदनाव्दारे केलेली आहे, मंत्रालयात जाऊन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी या मागणीचे निवेदन मंत्री महोदय यांना सादर केले आहे.
                कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दि.२२ मार्च,२०२० पासून देश व महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहिर केला होता,परंतु शासनाच्या आदेशानुसार नव्यामुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या कांदा-बटाटा मार्केट,मसाला मार्केट,अन्न-धान्य मार्केट,भाजीपाला व फळे मार्कट हे बाजार आवार सुरु असून,या बाजारपेठांमधून नागरिकांना अन्न-धान्य,भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याकरीता बाजार आवारातील कामे चालू असून, महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेले माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार मालाची चढ-उताराची कामे करीत आहेत,त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झालेला नाही. तसेच महाराष्ट्रातील इतर बाजार समित्या,केंद्र शासनाच्या गॅस व पेट्रोलियम कंपन्या, खत कारखाने, रेल्वे माल धक्के व इतर अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरु असून तेथे माथाडी कामगार कामे करीत आहेत, तसेच माथाडी मंडळात नोंदीत असलेले सुरक्षा रक्षक कामगार हॉस्पीटल व इतर अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत.कृषि उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवार व अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याच्या ठिकाणची कामे चालू रहाण्यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यामातून विशेष प्रयत्न केले.
                कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगावर मात करीत आपला जीव मुठीत घेऊन माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन कांही सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाची लागण झाल्यास औषधोपाचाराच्या खर्चाची किंवा दुर्देवाने मृत्यू आल्यास संबंधित सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत होण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि.२९ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावणारा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.
              कोरोना या महाभयंकर रोगावर मात करुन आपले कर्तव्य बजावणा-या सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो बिनधास्ततपणे आपले कर्तव्य बजावत राहिल तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी कष्टाची कामे करणा-या सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांच्या या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा व अंमलबजावणीचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी कळकळीची विनंती नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.