'चिनी बनावटीच्या वस्तूंवर अवलंबून राहू नका, स्वदेशी वापरा'

'क्रेडाई'तर्फे सदस्यांना आवाहन

              कराड (लक्ष्मीपुत्र) - गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करीत आणि आपण देशासोबत एकजुटीने उभे आहोत हे दर्शवीत, क्रेडाई या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेने आपल्या सदस्यांना, चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर अवलंबून न राहता स्वदेशी उत्पादनांवर भर द्या, असे आवाहन केले आहे. देशभरातील 20 हजार विकसकांचे प्रतिनिधित्व ही संस्था करते.
               या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना, 'क्रेडाई नेशनल'चे अध्यक्ष सतीश मगर म्हणाले, “आमचे सदस्य असणाऱ्या विकसकांना आम्ही आवाहन करतो, की त्यांनी चिनी वस्तूंवर अवलंबून न राहता, स्वदेशी' किंवा 'मेड इन इंडिया' ही संकल्पना आपल्या जीवनशैलीत व व्यवसायात अंगिकारावी. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित सर्व 250 उद्योगांनीदेखील, सध्या चीनमधून आयात होणारी उत्पादने स्थानिक पातळीवरच तयार करावीत आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांना
आम्ही करीत आहोत.
             कोविड-19 मुळे चीनमधून होणारा मालाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन झाल्यास, खरेदीचा वेळ कमी होईल, बांधकामातील वेळ कमी वाया जाईल आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. रिअल इस्टेट क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश कच्च्या मालाची निर्मिती एमएसएमई क्षेत्राकडून पूर्वीपासूनच केली जात आहे. या निर्मितीस प्रोत्साहन देऊन, सध्या आयात होणाऱ्या साहित्याच्या उत्पादनासाठी स्थानिक कंपन्यांना पाठिंबा दर्शविण्यास क्रेडाई सज्ज आहे. त्यायोगे 'विदेशीऐवजी स्वदेशी' हे धोरणही अमलात आणता येईल. रिअल इस्टेट क्षेत्रात आधीपासूनच देशातील 5 कोटी 20 लाख कामगार कार्यरत आहेत. स्वदेशीच्या धोरणामुळे रोजगाराच्या संधींमध्ये आणखी वाढ होईल आणि अर्थव्यवस्थेला आवश्यक ती चालना मिळेल. त्याचप्रमाणे, रिअल्टी क्षेत्राशी संबंधित 250 हून अधिक एमएसएमई उद्योगांनाही प्रोत्साहन मिळून त्यामधून 'जीडीपी मध्ये एकंदरीत योगदान वाढेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.