कोयना नदीपात्रात बोट चालविण्याचे पथकांना प्रशिक्षण



             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - गतवर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवल्याने अनेक गावे पाण्याने वेढली होते. पाटण शहरासह तालुक्यातही पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बोट उपलब्ध नसल्याने बाहेर काढणे कठीण झाले होते. गतवर्षाची पुनरावती यावर्षी उद्‌भवू नये म्हणून ज्या ज्याठिकाणी आपत्ती उद्‌भवते तेथे जिल्हात बोटी देण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यालाही अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दोन बोटी देण्यात आल्या असून बोटी चालवणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
             सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पाटण तालुक्याला आपत्कालीन बोटी व लाईफ जॅकेट देऊन सोमवारी पाटण येथील कोयना नदीमध्ये त्याचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, नायब तहसिलदार प्रशांत थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सपोनि तृप्ती सोनावणे, पाटणचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 देविदास ताम्हणे पुढे म्हणाले, गतवर्षी पाटण तालुक्याच्या सर्व विभागात पावसाने थैमान घातले होते. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. स्थलांतरीत होण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते घरातच अडकून पडले होते. केरा पुलानजिक असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखाना पाण्याखाली गेला होता. तर पाटण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या परिसरातही वीस फूट पाणी आले होते. येथे घराच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना गाडीच्या टुबद्वारे बाहेर काढण्यात आले होते. तर  केरा पुलापासून ते जुना बसस्थानक, झेंडाचौक, धांडे पूल, नवीन बसस्थानक, कळके चाळ, रामापूर, ग्रामपंचायतीची जुनी इमारत, मार्केट यार्ड परिसर असा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्याचबरोबर पाटण तालुक्याच्या विविध गावांनाही पुराने वेढा दिला होता.
                कराड ते चिपळूण मार्गावर ठिकठिकाणी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यावेळी बोट उपलब्ध नसल्याने विविध ठिकाणच्या लोकाना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. गतवर्षीप्रमाणे यावर्षी अडचणी उद्‌भवू नये म्हणून गतवर्षीचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत पाटण तालुक्यात पोहणाऱ्या जवानांची पथके  तयार करण्यात आली असून त्याना बोटी व लाईफ जॅकेट देऊन पाटण येथील कोयना नदीत स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या बोटीचे वजन 125 किलो आहे. या बोटीतून एक वेळेस दहा व्यक्तींना घेवून जाता येते. तसेच याचे इंजिन फोरस्ट्रोक असून पेट्रोल आणि ऑईल मिक्स करून वापरावे लागते. गतवर्षासारखी आपत्ती यावेळी उद्‌भवल्यास या बोटीमुळे नागरीकांना बाहेर काढणे सोयीस्कर होणार आहे. यासह प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्तीची माहिती याठिकाणी घेतली जाणार असल्याचेही ताम्हणे यांनी शेवटी बोलताना सांगितले.
             यावेळी मंडलाधिकारी पी. एल. गाडे, आनंदराव संकपाळ, पी. जे. ब्रम्हे, व्ही. एम. कुंभार, एच. डी. शेजवळ, तलाठी जयेश शिरोडे, भरत जाधव, पढंरीनाथ शिंदे, ए. व्ही. घाडगे, के. एस. देवकर, पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हराळे भोसले, विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, टी. पी. थोरात, दुमणे, ग्रामसेवक सुनिल काबंळे, सी. डी. साळुंखे, डी. बी. कांबळे, प्रविण सुर्यवंशी, श्रीमती बांगर, भरत राठोड, सुनिल केदारी यांच्यासह ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.
            ---------------------------------------------
यावेळी कोयना नदीमध्ये प्रत्यक्षपणे बोटी कशा चालवायच्या याबाबत पूरग्रस्त गावातील तयार करण्यात आलेल्या युवकांच्या पथकांना, ग्रामसेवक, तलाठी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान पथकांना बोटींबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. हे प्रशिक्षण पाहण्यासाठी कोयना नदीकाठावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.