4 मे रोजी सत्यजितसिंह पाटणकर यांचा वाढदिवस साजरा होणार नाही
4 मे रोजी सत्यजितसिंह पाटणकर यांचा वाढदिवस साजरा होणार नाही
पाटण (लक्ष्मीपुत्र) - पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा सोमवार दि. 4 मे रोजी असलेला वाढदिवस कोरोना संकटामुळे यावेळी साजरा केला जाणार नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे पाटण विधानसभा मतदारसंघचे अध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की सध्या जगभरात कोरोना या महाभयंकर संकटाने हाहाकार माजवला आहे. भारतातही याचे अनेक बाधीत व त्यापैकी काहींचा दुःखद मृत्यूही झाला आहे. याची झळ आपल्या जिल्हा व मतदारसंघालाही बसत आहे. यासाठी सावधानता बाळगण्यासाठी लाॅकडाउन, संचारबंदी, नाकाबंदी, जमावबंदी आदी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत व आपणही त्याचे काटेकोरपणे पालन करत आहोत. खबरदारी हीच आपली जबाबदारी असल्याने यापुढे किती दिवस या संकटाचा सामना करावा लागेल हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु आपण जेवढी सावधानता बाळगून खबरदारी व आरोग्याची काळजी घेवू तेवढ्या लवकर आपण यावर मात करणार आहोत. याच दरम्यान हा वाढदिवस आल्याने तो साजरा करण्यापेक्षा आपणच सत्यजितसिंह पाटणकर यांना यावेळी घरात बसून आपले व आपल्या कुटुंबीय, समाज व गावांचे आरोग्य सुरक्षीत ठेवून काळजी घेत शुभेच्छा द्याव्यात. यासह आपल्या संस्था, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपापले गाव, विभागात कोरोना पार्श्वभुमीवर आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेताना या दरम्यान स्थानिक जनतेला कोणत्या अडचणी येत असतील तर त्याचा पाठपुरावा करावा. आपल्या विभागातील गोरगरीब, मजूर, कष्टाळू लोकांना जर अन्नधान्य पुरवता आले तर त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. हे करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच हे सामाजिक काम करावे. बॅनरबाजी, हार, तुरे, शाली, पुष्पगुच्छ आदींचा खर्च हा स्थानिक गोरगरीबांच्या कल्याणासाठी करावा याच मनोभावे सत्यजितसिंह पाटणकर यांना शुभेच्छा ठरतील असे आवाहनही राजाभाऊ काळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा