१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ उपलब्ध
जिल्ह्यात ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप ;
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध - जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते
सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 ते 5 एप्रिल अखेर जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 19 शिधापत्रिकाधारकांना तब्बल ५२ हजार १८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 17 लाख 78 हजार 388 आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा या लाभार्थ्यांना सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांद्वारे लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड 25 किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड 1० किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदुळ दिला जातो.
सातारा जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे ३१ हजार ६४४ क्विंटल गहू, २० हजार ५४० क्विंटल तांदूळ, तर १०१ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यात अडकलेल्या शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने त्यांचे आधार नंबर व १२ अंकी शिधापत्रिका नंबर यांची खात्री करून अन्नधान्य देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य यांना प्रति सदस्य 5 किलो प्रमाणे तांदूळ माफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्डधारकाने (प्राधान्य कुटुंब लाभार्थी) (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य) नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला (प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य)) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य ) नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ साधरणात: 15 एप्रिल नंतर पात्र कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार (प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम पुणे यांच्याकडून प्राप्त करुन घेतले जात आहे. 15 एप्रिल नंतर टप्याटप्याने पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य मे आणि जून मध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस विभाग यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले असल्याची माहितीही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा