कोरोनाला मूठमातीसाठी निर्वाणीचा संघर्ष महत्वपूर्ण टप्यावर
कोरोनाला मूठमातीसाठी निर्वाणीचा संघर्ष महत्वपूर्ण टप्यावर
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) -
सातारा जिल्ह्यात व प्रामुख्याने कराड तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढते संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवार 26 पासून पाटण तालुक्यातील बहुतांशी गावात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाटण शहरासह तालुक्यातील मोठी गावे, सद्यस्थितीतील कोरोनाविरोधातील निकराच्या लढाईत लॉकडाऊन हाच निर्वाणीचा उपाय असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी स्थानिक बाजारपेठ कडकडीत बंद असून शहर व तालुक्यात शासनाने राबवलेल्या परिणामकारक उपाययोजना व त्यास नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद यामुळे सद्यस्थितीत तरी तालुका याबाबतीत सुदैवी ठरला असून कोरोनोला मूठमाती देण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांचा हा निर्वाणीचा संघर्ष महत्त्वपूर्ण ठरला आहे.
तब्बल सव्वा महिन्यापासून अधिक काळ पाटण शहर व तालुक्यात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठा बंद आहेत. रेड झोन'मध्ये असलेल्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या कराड तालुक्यात समोर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी पावले उचलत कराडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पाटण शहरासह तारळे, मल्हारपेठ, नाडे, नवरस्ता, ढेबेवाडी, तळमावले आदी बहुतांशी ठिकाणी दवाखाने व अपवादात्मक अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याची कडक अंमलबजावणी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. शहरातील बाजारपेठेसह जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व बाजारपेठा व नागरी वस्तीतील रस्ते निर्मनुष्य झाले. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. यापुढील काळात ही नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.
तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सहाय्यक निरीक्षक तृप्ती सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील आदीसह नगरपंचायत आरोग्य कर्मचारी सफाई कामगार कोरोनाविरोधातील या संघर्षात जीव धोक्यात घालून काम करत असून नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा