कृष्णा अभिमत विद्यापीठाचा व्हर्च्युअल दीक्षांत सोहळा उत्साहात
शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव प्रयोग; 652 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपला 9 वा वार्षिक दीक्षांत सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने घेत शैक्षणिक क्षेत्रात एक नवाअभिनव प्रयोग केला. आजच्या या व्हर्च्युअल दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील 652विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यापीठांनी संबंधित अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा झाल्यानंतर 180 दिवसांच्या आत दीक्षांत सोहळा आयोजित करून,विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे आवश्यक असते. पण कोराना काळात जाहीर पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे कृष्णा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने व्हर्च्युअल पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी ठीक 11.30 वाजता कृष्णा विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल दीक्षांत सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.
या सोहळ्यात कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कराड येथील मुख्य कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ.प्रवीण शिनगारे, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य डॉ. अतुल भोसले,विनायक भोसले, डॉ. दीपक टेम्पे, डॉ. सबिता राम, सौ. मनिषा मेघे,कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे,परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबुड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, दिलीप पाटील सहभागी झाले होते. तर नागपूर येथून विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा व कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा सहभागी झाल्या होत्या. तसेचविविध विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि डीन अकॅडमिक्स हेदेखील सहभागी झाले होते.
या दीक्षांत सोहळ्यात2019-20 या शैक्षणिक वर्षातीलविविध अधिविभागातील 652 विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये वैद्यकीय विज्ञान अधिविभागातील 307 विद्यार्थ्यांना, दंतविज्ञान अधिविभागातील 107 विद्यार्थ्यांना, फिजिओथेरपी अधिविभागातील 85 विद्यार्थ्यांना, नर्सिंग अधिविभागातील 126 विद्यार्थ्यांना आणि अलाईड सायन्स अधिविभागातील 27 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. यापैकी वैद्यकीय विज्ञान अधिविभागातून 11 जणांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
दरम्यान, सद्यस्थिती पूर्ववत झाल्यानंतर काही काळाने नियमित विस्तारित दीक्षांत सोहळा आयोजित करून, या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या नियमित विस्तारित दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या पदवी प्रदान आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार, पदक आणि पारितोषिकेदेखील प्रदान केली जाणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा