कृष्णा हॉस्पिटलमधील अन्य वैद्यकीय सेवांना पूर्ववत प्रारंभ
कृष्णा हॉस्पिटलमधील अन्य वैद्यकीय सेवांना पूर्ववत प्रारंभ
कराड (लक्ष्मीपुत्र) - येथील कृष्णा हॉस्पिटलमधील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभाग आरोग्यसेवा नेहमीप्रमाणेच सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी केले आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटल सुरवातीपासून आघाडीवर आहे. याठिकाणी कोरोनासाठी स्वतंत्र वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला असून, या रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्टाफही तैनात करण्यात आला आहे. मात्र कृष्णा हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोनाचेच उपचार सुरू आहेत, असे समजून अन्य गंभीर आजार असलेले रूग्ण स्वत:ची नियमित तपासणी अथवा त्यावरील उपचार पुढे ढकलत आहेत. विशेषत: कॅन्सरग्रस्त असलेले रूग्ण किमोथेरपी किंवा त्यांचे अन्य उपचार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हे हानीकारक असून, अन्य गंभीर आजार असणार्या रूग्णांनी स्वत:वरील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागातील आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा. आंतररूग्ण सेवेमध्ये ज्यांच्यावर कॅन्सर, हृदयरोग किंवा अन्य प्रकारच्या गंभीर आजारांची तपासणी, निदान व उपचारसुविधा नियमित सुरू आहे. तसेच पूर्वीच्याच निर्धारित वेळेत कृष्णा हॉस्पिटलचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) सुरू आहे.
रूग्णांनी उपचारासाठी येताना आवश्यकता असेल तर सोबत फक्त एकाच जबाबदार व्यक्तीला अथवा नातेवाईकास आणावे. तसेच मास्कचा वापर,फिजिकल डिस्टन्सिंग,सॅनिटायझरचा वापर अशा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा