दिव्यांग जिल्हा न्यायाधीश एस. ए. ए.आर. औटी ठरले कोरोना योद्धा

तालुका विधी सेवा प्राधिकरणाने बजावली तिसऱ्या डोळ्याची भूमिका 


                  कराड (लक्ष्मीपुत्र) - देह विक्री करणाऱ्या वारांगना.... टाळी वाजवत येणारे तृतीयपंथी.... अन् रस्त्यावर विवस्त्रपणे फिरणारे वेडसर माथेफिरू.... कोरोना सारख्या महाभयानक साथीच्या आजारातही समाजाच्या मूळ प्रवाहापासून शेकडो कोस दूर असणारा हा दुर्बल आणि उपेक्षित घटक.... सोफिस्तिकॅटेड लोकांच्या गरिबीच्या व्याख्येत न बसणाऱ्या या घटकालाही उदर आहे.... पोटातील आगीमुळे यांच्याही जीवाची लाहीलाही होत असेल, या भावना जाणून स्वतः दिव्यांग असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीनदुबळ्यांच्या आयुष्यातील आर्थिक आणि मानसिक विकलांगपण दूर करण्यासाठी अहोरात्र झटत असणारे कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी व विधी स्वयंसेवक अनंत लादे यांनी या समाजातील उपेक्षित घटकांना मदत पोहोचवून त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करून त्यांच्या जीवनात  गारवा आणण्याचे काम केले आहे.
                महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्याचे काम केले जाते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून लॉक डाऊन जारी करावे लागल्यामुळे राज्यातील प्रशासकीय पातळीवर सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हा व तालुका स्तरावरील विधी सेवा प्राधिकरण यांना निगराणी ठेवण्याचे निर्देश ना मुंबई उच्च न्यायालय व राज्य विधी प्राधिकरणाने दिले आहेत. कोरोना मुळे सर्वच ठप्प झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या चुली विझू लागल्या. सुरुवातीच्या काळात गरिबांना मदतीचे असंख्य हात धावू लागले, मात्र भूकंप, महापूर, दुष्काळ याप्रमाणे कोरोना एका ठराविक भागातील संकट नसल्यामुळे व जगभरात संक्रमित झाल्यामुळे  सर्वांचीच आवक बंद झाली. त्यामुळे मदतीचे हातही आखडते होऊ लागले आहेत, तरीदेखील कराड तालुका विधी सेवा समिती कोरोना निर्मूलनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलत असून समाजातील अत्यंत गरजू आणि दुर्बल लोकांपर्यंत मदत पोहोचण्याकरता सदैव तत्पर राहत आहे.
               कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. ए. ए. आर. औटी यांनी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून फ्रॉम द फर्स्ट डे या लढाईसाठी कंबर कसली. न्यायालयाचा संपूर्ण परिसर त्यांनी  सॅनिटायझिंग करून घेतला. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हाताने स्पर्श न करता पायडल मारुन हात स्वच्छ करण्यासाठी हॅण्ड वाश पंप बसविला. न्यायालयात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर्स पुरवले. स्वतःसह सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. यानंतर त्यांनी तालुका स्तरावर सुरू असणाऱ्या प्रशासनाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले. संपूर्ण सातारा जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून एकसलग कोणतीही सुट्टी न घेता न्यायदानाचे काम करणारे ते एकमेव न्यायिक अधिकारी आहेत.
              सुरुवातीच्या काळात त्यांनी  विधी स्वयंसेवक लादे यांच्या माध्यमातून कोरोना च्या भीतीपोटी  हॉस्पिटल्स व दवाखाने बंद करून घरात बसलेल्या डॉक्टरांचा अहवाल जिल्हाधिकारी सातारा यांना सादर केला. यानंतर स्थलांतरित मजुरांना एकत्रीकरण कक्षात ठेवलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांना असणाऱ्या गरजांची माहिती संकलित केली. नारायणवाडी जवळील विराज मल्टीपर्पज हॉल व शिवडे येथील आकाश मल्टीपर्पज हॉल याठिकाणी स्थलांतरित दोनशे पंधरा मजुरांना दोन वेळ जेवण व एक वेळ नाश्ता याची सोय केल्याबाबतचा अहवाल प्राप्त केला. बनवडी कॉलनी येथील तामिळनाडू, उत्तर प्रदेश व झारखंडच्या स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटप केले. कराड येथील रेड लाईट एरिया असणारा बुधवार पेठ परिसरातील वारांगना मदतीपासून वंचित होत्या. विधी सेवा समितीचे अध्यक्ष औटी साहेब यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन त्या महिलांना अन्नधान्याच्या किटचे वितरण केले. तसेच तेथील महिलांना कोरोना संक्रमाना बाबत माहिती देऊन काळजी घेण्याबाबतचे समुपदेशन केले. आजपर्यंत देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या वारांगनाना स्वतःचे अपंगत्व बाजूला ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचून स्वतःच्या हाताने मदत देणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्याला पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आयुष्यात प्रथमच त्या निशब्द झाल्या होत्या. अनेक जणींना गहिवरुन आले तर अनेक वारांगनाना त्यादेखील हाडामासाच्या व्यक्ती आहेत याची आयुष्यात प्रथमच प्रचिती आली . हा प्रसंग पाहून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. तृतीयपंथी लोक हे देखील सध्याच्या परिस्थितीत बिकट संकटात सापडले आहेत. त्यांना शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोचवण्याचे अद्भुत कार्य विधि स्वयंसेवक अनंत लादे यांनी पार पाडले. बिहार येथील बारा स्थलांतरित मजुरांना अन्नधान्याची अत्यंत निकड असताना प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचवणे जिकिरीचे ठरले होते यावेळी विधी समितीच्या अध्यक्षांनी स्वतः पदरमोड करून या निर्वासितांना मायेचा आधार दिला. जिल्ह्यातील सर्वात जास्त कोरोना बाधित असणाऱ्या वनवासमाची या गावात आणखी बिकट परिस्थिती उद्भवू नये म्हणून लोकांच्या गरजा जाणून त्याठिकाणी अन्नधान्याचे वितरण केले. दुर्बल, गरीब, वंचित व गरजूंना देखील मदत पुरवण्याचे कार्य हे  कोरोना योद्धे करत आहेत.
               जीवनावश्यक मदती बरोबर प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात विधी सेवा प्राधिकरण पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. नुकतेच विधी समितीच्या अध्यक्षांनी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची तातडीची बैठक बोलावून प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जनता व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे काम केले. याकामी त्यांना तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका पुरवठा अधिकारी विलास घबाले, विधी सेवा प्राधिकरणाचे महेश काटू, यांनी व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली. प्रसंगी न्यायाधीश औटी व न्यायालयीन  कर्मचारी यांनी वर्गणी जमा करून वनवासमाची येथील पंचवीस कुटुंबीयांना अन्नधान्याचे किट पुरवले.
               कराड तालुक्यात कोरोना ग्रस्तांना आकडा वाढल्यामुळे प्रशासनाने कंटेनमेंट झोन च्या माध्यमातून काही दिवसांपासून कठोर निर्बंध लादले आहेत मात्र कोरोना मुळे भूकबळी ची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी कराड तालुका विधी सेवा समिती तिसरा डोळा म्हणून कार्यरत आहे.
दिव्यांगपणा तरीही अखंड न्यायदान, समाजकाम आणि पदरमोडही....
            कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने सुरुवातीला 50 टक्के यावरून शेवटी पाच टक्‍क्‍यांपर्यंत कर्मचारी सेवेत ठेवून इतरांना शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या जाहीर केल्या, मात्र कराड विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी स्वतः दिव्यांग असतानाही लॉक डाऊन पासून एक दिवसही रजा घेतलेली नाही, याउपर म्हणजे सुट्टीच्या दिवशीही म्हणजे रविवारी देखील ते वक्तशीरपने सेवेवर उपस्थित होते व आहेत. वयाची 55 वर्षे पूर्ण झाली असतानाही समाजभावी वृत्तीमुळे स्वतःचे अपंगत्व बाजूला ठेवून ते ऑन दी स्पॉट  कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी कोरोना चे भयावह दृश्य जवळून अनुभवल्यामुळे त्यांनी जवळचे घामाचे पैसे याकामी खर्ची घालून मदत केली आहे. रमजानच्या पवित्र दिवसात ते गोरगरिबांना स्वखर्चाने अन्नधान्याचे किट वितरित करीत असल्यामुळे अनेकांसाठी ते मसीहा ठरले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.