कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कराडमध्ये साकारली जाणार 6500 फूट लांबीची रिबन लिम्का बुक रेकॉर्डमध्ये होणार नोंद


 कराड -  येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कॅन्सरच्या जनजागृतीसाठी शनिवारी (ता. 3) एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पिंक स्ट्रीट’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गंत कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांकडून कॅन्सर जनजागृतीसाठी तब्बल 6 हजार 500 फूट लांबीची भव्य रिबन साकारण्यात येणार असून, त्यावर हजारो विद्यार्थी आपल्या हातांचे ठसे उमटवून अनोख्या पद्धतीने कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने होणार्‍या या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडूनही घेतली जाणार असल्याची माहिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि कृष्णा हॉस्पिटलच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. आनंद गुडूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर आणि कृष्णा हॉस्पिटलमधील किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर उपस्थित होत्या.

मुंबई येथील ‘झुवियस लाईफसायन्सेस’च्या सहकार्याने कृष्णा अभिमत विद्यापीठात शनिवारी (ता. 3) आणि रविवारी (ता. 4) विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये शनिवारी सकाळी 8.30 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात 6 हजार 500 फूट लांबीची भव्य कॅन्सर जनजागृती रिबन साकारली जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार आहे. याचदिवशी सकाळी 10 वाजता कर्करोग विभागाच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असून, या चर्चासत्रात मान्यवर डॉक्टर्स कॅन्सरची लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणार आहेत. रविवारी सकाळी 9 वाजता कृष्णा अभिमत विद्यापीठाचे विद्यार्थी भव्य रॅली काढून कॅन्सरबाबत सामान्य जनतेत जागृती करणार आहेत. यामध्ये रोटरी क्लब कराड, कराड नगरपरिषद आणि कराडमधील विविध सामाजिक संस्थांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत कॅन्सरबाबत जागृती संदेश देणार्‍या पोस्टर्सचे डिझाईन अणि टी शर्ट पेंटींग अशा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले असल्याचे कुलसचिव डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. आनंद गुडूर म्हणाले, की डिसेंबर 1996 मध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरजेनंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रथमच हा स्वतंत्र कर्करोग विभाग सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या देखरेखीखाली सुरू झाला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विभागात सध्या दररोज 100 हून अधिक रूग्ण उपचार घेतात. कर्करोगावरील शस्त्रक्रिया, रेडिएशन व किमोथेरपी अशा तिन्ही उपचार पद्धतीची सोय याठिकाणी उपलब्ध आहेत. रेडिएशन विभागात अत्याधुनिक लिनिअर अ‍ॅक्सिलरेटर मशिनद्वारे रूग्णांवर उपचार केले जातात. टाटा हॉस्पिटल, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट यासारख्या भारतातील व जगातील सर्व उच्च दर्जाच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे अमेरिकन बनावटीचे व्हेरियन या कंपनीचे हे रेडिएशन थेरपी मशिन सातारा जिल्ह्यात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आले आहे. या मशिनमुळे फक्त कर्करोगांच्या पेशींवरती मारा करून त्यांच्या बाजूला असणार्‍या चांगल्या पेशींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय कृष्णा हॉस्पिटलच्या मेडिकल ऑन्कॉलॉजी विभागात दररोज 20 ते 30 रूग्ण किमोथेरपी घेत असतात. त्यासाठी स्वतंत्र 35 बेडस्चा वॉर्ड आहे. रक्ताच्या कर्करोगासाठीही स्वतंत्र विभाग असून, याठिकाणी डॉ. रश्मी गुडूर या किमोथेरपी व रक्ताच्या कॅन्सरतज्ज्ञ म्हणून पूर्णवेळ कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्ताचा कॅन्सर झालेल्या अनेक रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

याशिवाय कर्करोगावरील सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे केल्या जातात. यासाठी लागणारे सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अद्ययावत उपकरणे, तज्ज्ञ कर्करोग शल्यचिकित्सक डॉक्टर्सची टीम आणि मान्यताप्राप्त तज्ज्ञ नर्सेस कार्यरत आहेत. तसेच कृष्णा हॉस्पिटलमधील रेडिओलॉजी विभागात एक्स रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, 1.5 टेस्ला एम.आर.आय., स्तन कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी अशा सर्व अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता आहे. जिल्ह्यात प्रथमच स्तनाच्या कर्करोगासाठी एम.आर.आय.ची सोय कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या सर्व सुविधांमुळे कर्करोगावरील सर्वप्रकारच्या अद्ययावत व अत्याधुनिक उपचारांचे केंद्र म्हणून कृष्णा हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रात नावारूपाला आले असल्याचे डॉ. गुडूर यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.