वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करा - डॉ. अतुल भोसले
कराड,दि.१२ (सावा) - वाकुर्डे योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असणार्या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
इस्लामपूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जाण्यासाठी आज सकाळी सव्वा दहा वाजता मुंबईहून कराड विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. याठिकाणी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कराड दक्षिणमध्ये शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील ग्रामस्थांच्यावतीने वाकुर्डे योजनेबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
कराड दक्षिण मतदारसंघातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकर्यांना ही रक्कम भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या डाबंरीकरण व खडीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधीची मागणीही करण्यात आली.
याप्रसंगी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जगदीश जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पैलवान धनाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा