श्रीयात्रा एका अजातशत्रूची..सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील
प्रशासकीय सेवेतून कामाला सुरुवात करणारे व माणसांच्या सहवासासाठी सतत तहानलेले व्यक्तिमत्व म्हणजे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील. प्रचंड धडपड व जिद्दीच्या जोरावर शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या जीवनकार्याचा हा थोडक्यात मागोवा:
उत्तम प्रशासक, उत्तम वक्ता, थोरामोठ्यांचा सहवास लाभलेले, साहित्य रसिक, कलावंत व लोककलावंतांबद्दल अस्था असणारे, सुसंस्कृत वारसा लाभलेले राजकारणी, समाजकारणी, अजातशत्रू अशा अनेक गुणवैशिष्ठ्यांनी भारून गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे कराडचे श्रीनिवास पाटील! अंगभूत गुणवत्ता, कल्पकता व अविरत कष्टाची तयारी असेल तर एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकते, याचा ते आदर्श आहेत. कष्टाच्या व चिकाटीच्या बळावर त्यांनी प्रशासनातील वेगवेगळी पदे भूषवली. त्याचा वापर स्वतःच्या मिरासदारीपेक्षा गोरगरिबांचा विकास व्हावा, त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी सदैव केला.
श्रीनिवास पाटील यांच्या पायाला जणू चक्र आहे. त्याबळावर त्यांनी त्या त्या भागातील सर्व थरांतील लोकांचा स्नेह मिळवला. त्याबळावरच त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे उभी केली. त्यांना खेड्यांचे प्रश्न माहीत होते व आहेत. पाणी, रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा अनेक प्रश्नांच्या भोवतीच ही माणसे गुरफटली आहेत. त्याला उत्तरे होती पण तसे प्रयत्न होत नव्हते. नेहमीच्या प्रशासकीय चक्रात ते प्रश्न जादाच अडकत गेले होते. श्रीनिवास पाटील यांनी लोकांच्या या प्रश्नांना चाकोरीतून बाहेर काढले. जे लोकोपयोगी त्यांना प्राधान्यक्रम, असे साधे समीकरण मांडून त्यांनी लोकांची कामे केली. माणसांचा स्नेह मिळवला. केवळ प्रशासनातीलच नव्हे तर राजकीय व्यक्तींनाही जमणार नाही एवढा लोकप्रपंच त्यांनी भोवती गोळा केला.
त्यात गरीब जसे आहेत, तसे श्रीमंतही आहेत. शिक्षक, अभ्यासक, साहित्यिक, गायक, चित्रकार, नाट्य व चित्रपट कलावंत, कुस्तीगीर, राजकारणी, समाजकारणी अशा साऱ्यांच्या मैफलीत ते रमत गेले. आजही रमत आहेत. त्यात त्यांनी कधी जात-पात पाहिली नाही, त्यांचा राजकीय पक्ष पहिला नाही. ही माणसे त्या त्या क्षेत्रातील वैभव आहेत, हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. तो जपला, वाढवला पाहिजे याच भूमिकेतून ते कार्यरत राहिले. त्यांच्याशी मैत्र करीत राहिले. माणसे जोडत राहिले.
विशिष्ट वेळ येताच त्यांनी नोकरी सोडून राजकारणात भाग घेतला. सनदी सेवेचा राजीनामा देऊन ते थेट खासदारकीला उभे राहिले. तिथेही ते यशस्वी झाले. स्वकर्तृत्वाच्या बळावर ते दोन वेळा खासदार झाले. संसदेत ते लोकांचा आवाज बनले. त्यांनी तिथे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मांडले. प्रभावी संवाद कौशल्य, कोणत्याही प्रश्नाचे मूळ माहित, सर्व राजकीय पक्षांशी उत्तम संपर्क, अशी अजातशत्रू व्यक्तिमत्वाची वाट त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदापर्यंत घेऊन गेली. तिथेही त्यांनी आपली वेगळी मुद्रा उठवली व आजही तेवढ्याच उमेदीने ते कार्यरत आहेत.
एकूणच श्रीनिवास पाटील यांचे आयुष्य म्हणजे एक चैतन्याचा खळाळता झरा आहे. आज वयाची ७७ वर्षे ओलांडली तरी त्यात तसूभरही कमी झाली नाही. कुठून येते ही उर्जा? कुठून येतो हा उत्साह? कुठून येतो हा चैतन्याचा बहर? हा या सातारा जिल्ह्याच्या मातीचा गुण आहे. ही छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या मातीत त्यांच्या शूर शिपायांच्या घोड्यांच्या पावलाचे ठसे उमटले आहेत. या भूमिला वारसा आहे तो स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचा. सुसंस्कृत राजकारण म्हणजे काय यांची देशाला दिशा दाखवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून सारे आदराने त्यांच्याकडे पाहतात. श्रीनिवास पाटील यांना अगदी शालेय जीवनापासून स्व. चव्हाण साहेबांचा स्नेह लाभला. लो.बाळासाहेब देसाई यांचे मार्गदर्शन लाभले, आदरणीय शरद पवार यांच्यासारखे जिवलग मित्र मिळाले. प्रत्येक माणसापासून जे जे चांगले ते ते त्यांनी स्वीकारले. त्यामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व उभे राहिले. आज लाभलेले दिवस ही त्याचीच परिणती आहे. सार्वजनिक क्षेत्रात ते आजही तेवढ्याच उमेदीने, पूर्ण शक्तीने कार्यरत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. तसेच आयुष्याचेही अनेक टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर त्यांना नवे काही शिकता आले. नवे काही अनुभवता आले. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. पहिला टप्पा आहे त्यांच्या बालपणाचा.
पाटण तालुक्याच्या कोयना खोऱ्यातील निसर्गसंपन्न अशा मारुल हवेली या गावात त्यांचा जन्म झाला. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराडमध्ये झाले. महाविद्यालययीन शिक्षण पुण्यात झाले. कायद्याचे शिक्षण मुंबईत झाले. स्पर्धा परीक्षा देऊन ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले. तिथे प्रदीर्घ ३५ वर्षे विविध पदावर, राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यानंतर ते एकदम राजकारणात आले. अशी उच्च स्थानावरून राजकारणात आलेली माणसे शक्यतो निवडणुकीच्या फंदात पडत नाहीत. ती विधानपरिषदेवर व राज्यसभेवर जात असतात. मात्र श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कराड मतदारसंघात निवडणुकीचा शड्डू ठोकला. जनतेच्या पाठबळावर ते दोन वेळा खासदार झाले. लोकांचे प्रश्न सोडवत राहिले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे सिक्कीमचे राज्यपाल पद. तिथेही ते यशस्वी झाले. हे पद म्हणजे त्यांच्या सर्वसमावेशक कार्याची पावती होती. जे एकांगी विचार करतात वा भूमिका घेतात त्यांना सरकार बदलले की त्यातून बाहेर पडावे लागते किंवा त्यांना बदलले जाते. येथे तसे काही घडले नाही, हेच त्यांच्या कार्याचे थोरपण आहे. पक्षीय राजकारण हे सोयीसाठी असते. त्यापलीकडेही आपली काही जबाबदारी असते. ती जे उत्तम निभावून नेतात त्यांना कसल्या गोष्टी भिववीत नसतात. त्यामुळे श्रीनिवास पाटील आजही खंबीरपणे उभे आहेत. आपले काम ते नेटाने करीत आहेत.
अशा या कर्तृत्ववान, सळसळत्या चैतन्याचा अल्पसा जीवनपट मांडण्याचा येथे प्रयत्न आहे. तो आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरू शकतो. त्यांना नवी उमेद देऊ शकतो. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या हिमतीवर एक नवीन वाट चोखाळली आहे. ती कोणालाही प्रेरक ठरेल अशी आहे. यासाठी हा प्रपंच!
श्रीनिवास पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, कोयनेच्या खोऱ्यातला. पाटण तालुक्यातील मारुल हवेली हे त्यांचे जन्मगाव. उणेपुरे तीन हजार लोकसंख्येचे हे गाव. त्यावेळी तर लोकसंख्या आणखी कमी होती. निसर्गाचे गावाला वरदान. प्रामुख्याने कांदा व भाजीपाला पिके घेतली जायची. आता सारे ऊसमळेच फुललेले आहेत. अशा गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. हा काळ तसा स्वातंत्र्यलढ्याने भारावून टाकणारा होता. यासाठीच्या ज्या चळवळी झाल्या त्या कराड, सातारा अशा भागात झाल्या. मात्र त्याच्या झळा गावागावापर्यंत पोहोचत होत्या. हा भाग तुलनेने आडवळणी होता. मात्र हे सारे कळण्याचे ते वय नव्हते. सारे बालपण या मातीत खेळण्यात गेले. अनेकदा या बालमुठींनी ही माती घट्ट पकडली आहे. अंगावर घेतली आहे. त्यात कधी लोळण घेतली आहे. ही माती आजही श्रीनिवास पाटील यांना गंधीत करते. त्यांना सतत ओढून घेते. त्यामुळे मनात येईल त्यावेळी ते गावाला भेट देतात. येथील ग्रामदेवतेपुढे ते नतमस्तक होतात. जुन्या जाणत्यांसह नव्या पिढीशी संवाद साधतात. त्यावेळच्या आठवणीत रमतात.
त्याकाळी वडिलार्जित दोन खोल्यांचे घर होते. त्यातही एक खोली अंधारी. त्या अंधाऱ्या खोलीतच त्यांचा जन्म झाला. पूर्वी बाळंतीनीसाठी अशी अंधारी खोली असायची. त्या काळी ग्रामीण भागात घड्याळ असण्याचा प्रश्नच नव्हता. सारे सांकेतिक घड्याळ असायचे. दिवसउगवायला, दिवसमावळतीला, मध्यानरातीला, कोंबडा वरडायच्या येळेला, असे सारे सांकेतिक घड्याळ होते. श्रीनिवास पाटील यांनी एकदा जन्मवेळ शोधण्याचा प्रयत्न केला. एका आजीला त्यांनी ‘माझा जन्म कधी झाला?’ असे विचारले. त्यावेळी तिने उत्तर फार गमतीदार दिले. त्या म्हणाल्या, “तुझा जन्म झाला त्यायेळला सुताराच्या मेटावरच्या पिंपरावर सूर्य आला होता.” आता हे घड्याळ आणखी अवघड होऊन बसले. श्रीनिवास पाटील यांनी जिद्द सोडली नाही. मग एक दिवस ११ फेब्रुवारीला ते त्या सुताराच्या मेटावर गेले. तेथील पिंपळावर सूर्य कधी येतो ते त्यांनी पहिले. ती वेळ होती सकाळी सव्वा सातची. ते जन्माला आले त्यावेळी पुनव (पौर्णिमा) होती, हे त्यांना नंतर वडिलांच्याकडून कळाले. नव्याच्या पुनवेला जन्मलेले हे बाळ पुढे सतत नाविण्याच्या शोधात राहिलं. यांची जाणीव त्यावेळी घरच्यांना झाली होती की नाही कोणास ठाऊक ?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा