कराड वार्तापत्र - गोरख तावरे ( दैनिक सामना ) स्वच्छ सर्वेक्षणासाठी मलकापूर म्हणते "मी तयार आहे"



सामाजिक कार्यक्रमातून स्वच्छतेचा जागर मलकापूर नगरपंचायतीने निर्माण केला आहे. मलकापूर शहरात स्वच्छतेबाबत मोठय़ा प्रमाणात जागृती निर्माण करण्यात आली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ साठी मलकापूर शहरात सध्या विविध उपक्रम राबवित आहेत. नागरिकांसह महिलांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा म्हणून नगरपंचायत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ‘तिळगूळ घ्या, गोड बोला ऐवजी तिळगूळ घ्या, स्वच्छता राखा,’ असा स्वच्छतेचा संदेश दिला गेला आहे. तर मलकापूर शहरातील घरासमोर रोज रांगोळी काढून "मी तयार आहे" असा संदेश दिला जात आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये जाहीर झाली आहे. ४ हजार ५१ शहरांमध्ये स्पर्धा होत आहे. मलकापूरने यात सहभाग घेताना ‘मलकापूर हरित महासिटी कंपोस्ट’ खत असे नामकरण दिले आहे. नगराध्यक्षा सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू केली असून स्वच्छ मलकापूरसाठी नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रबोधन केले जात आहे. नागरिकांसह महिलांचाही मोठा सहभाग स्वच्छता मोहिमेमध्ये दिसून येत आहे. मलकापूर नगरपंचायतीने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये बऱ्याच योजना कार्यान्वित केल्या आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धा योजनेंतर्गत तीन टप्प्यांत शहराचे ४ हजार गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सेवास्तर प्रगतीत १ हजार ४०० गुण देण्यात येणार आहेत. शासनाच्या या योजनेत नगरपंचायत स्थरावरील मलकापूर शहर हे एकमेव शहर आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कराड, सातारा असा आलेख असला तरी मलकापूर ही एकमेव नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सहभागी झालेली नगरपंचायत आहे. माजी आमदार कै.भास्करराव शिंदे यांनी "मलकापूर स्वच्छ व सुंदर " करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे कसोशीने प्रयत्न करीत आहे. 

मलकापूर  शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय अवलंबिले आहेत. शहराला देशात पहिल्या २५ शहरांमध्ये आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिका-यांनी ताकतीने तयारी सुरू आहे.मलकापुरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओल्या कच-यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प ८ जुलै २०१७ पासून कार्यान्वित केला आहे. ओल्या कच-यापासून मेकॉनिकल रोटरी बेस कंपोस्ट खत निर्मिती केली जात आहे. या खतास शासकीय लॅबमधून तपासणी करून ‘मलकापूर हरित महासिटी कंपोस्ट’ खत असे नामकरण केले आहे. ते खत केवळ नाममात्र ५ रुपये किलोप्रमाणे शेतक-यांना विक्री केले जात आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चौदा खासगी विद्यालये, महाविद्यालये, त्याचबरोबर बावीसअंगणवाड्या यांचा सामावेश केला आहे.

शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:साठीच स्वच्छता करायची आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा म्हणून शहरातील घराघरातील महिलाच स्वच्छतेबाबत जागृत झाली पाहिजे, असा विचार करण्यात आला आहे.या विचारानेच नगरपंचायत प्रशासनाने शहरातील गल्लोगल्ली हळदी कुंकू व तिळगूळ वाटपाचे कार्यक्रम केले जात आहेत. या कार्यक्रमातूनच ‘तिळगूळ घ्या स्वच्छता राखा’ हा संदेश तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचा जागर युद्धपातळीवर सुरू आहे. नाविन्यपूर्ण व कल्पकतेनुसार कार्यक्रम राबवून मलकापूर स्वच्छतेचा संदेश देण्यात अग्रेसर ठरली आहे.

मलकापूर शहर हे केवळ स्पर्धेपुरते स्वच्छ नव्हे तर कायमचेच स्वच्छ राहावे. यासाठी शहरातील लोकांनीही आपली मानसिकता बदलून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ च्या अनुषंगाने नगरपंचायतीने विशेष नियोजन केले असून, शहरातील ‘ओला व सुका’ कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ९ घंटागाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये पाच नवीन घंटागाड्यांचा समावेश करण्यात आला आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटगाडीत टाकावा, त्यासाठी शहरातील दहा हजार घरांत प्रत्येकी दोन बकेट प्रमाणे वीस हजार बकेटचे वाटप केले आहे.

नागरिकांची स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार आल्यास तिच्या तत्काळ निवारणाची सोय केली आहे. आपले शहर हे देशाच्या स्पर्धेत आहे. हे प्रत्येक नागारिकाने लक्षात ठेवले पाहिजे. ही स्पर्धेपुरती स्वच्छता नसून माझे घर, माझा परिसर व माझे शहर कायम स्वच्छ राहिले पाहिजे, अशी मनात खूणगाठ बांधून प्रत्येकाने स्वच्छतेसाठी मी तयार आहे, हा निश्चय केला पाहिजे. असा सदेश उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नागरिकांच्या मनामध्ये बिंबवल्याचे दिसून येत आहे. एकसंघपणे मलकापूर नगरपंचायतीला चांगला क्रमांक मिळावा. यासाठी सर्वच नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत असे दिसून येत. राजकारण विरहीत, गट - तट बाजूला ठेवून मलकापूर नगरपंचायतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. 

झोपडपट्टीच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन कोटींतून संरक्षक भिंत बांधली तसेच पाणी, रस्ते, गटर, स्वच्छतागृह, दिवाबत्तीसारख्या प्राथमिक सुविधा दिल्या. सुधारित झोपडपट्टीचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे. यापूर्वी नगरपंचायतीच्या उपक्रमात भाग घेऊन झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकाने नगरपंचातीच्या प्रगतीत हातभार लावला आहे. त्याप्रमाणेच स्वच्छ सर्वेक्षणमध्येही भाग घेऊन संपूर्ण झोपडपट्टी कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी कसोसीने नगरपंचायत प्रयत्न करीत आहे. याला झोपडपट्टीधारक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना मलकापूरसाठी त्यांनी विकास कामांसाठी विविध निधी दिला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.