एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज
( गोरख तावरे )
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य व स्फूर्तीदायक इतिहास सर्वांसमोर आहे. जगभरामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पोवाडा सर्वत्र आनंदाने गायला जात आहे. बलाढ्य व शक्तिशाली मुस्लिम राजवटीच्या विरोधात, शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने केलेली लढाईमुळे, ऐतिहासिक इतिहास निर्माण केला आहे.जगभरामध्ये अनेक लढाई व ऐतिहासिक घटना घडल्या मात्र, शिवाजी महाराजासारखा इतिहास कोणत्याही देशामध्ये घडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अल्प व विश्वासू, प्रामाणिक मावळ्यांच्या भरोश्यावर स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्मितीची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मावळ्यांच्या भरोशावर शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी झाले होते. इतकेच काय पण, मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात स्वराज्य निर्मितीसाठी तत्कालीन परिस्थितीत सहभागी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जगात निर्माण झाला नाही. शिवाजी महाराजांचा एक एक किस्सा सांगायचे झाले तर मोठमोठे प्रबंध लिहिले जातील. अनेक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाई, त्यांचा गनिमी कावा आणि शिवाजी महाराजांचे ध्येय धोरणावर अनेक विस्तृत पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर अनेक पोवाडे तयार केले गेले आहेत. अनेक स्फूर्तीदायी गीत तयार झाली आहेत. आजचा तरुण जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देत असतो. अशा घोषणा ऐकल्या की, अनेकांच्या अंगावर रोमांच उभा राहतो. झाले बहु, होतील बहु, परी या सम हा, असे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक इतिहास सांगण्यामुळे, अनेक वक्ते महाराष्ट्रामध्ये नामवंत झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवगाथेवर अनेक देशांतील अभ्यासक अभ्यास करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एका माळेमध्ये गुंफून, सर्वांच्या सोबतीने स्वराज्य निर्माण केले,
हा गौरवशाली, ऐतिहासिक आणि स्फूर्तीदायक इतिहास निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनामधील शिवाजी महाराजांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसांचे दैवत आहे. प्रत्येक मराठी माणसांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रति आदरभाव, स्नेहभाव आणि जिव्हाळा प्रचंड प्रमाणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक, गौरवशाली इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आणि प्राण आहे. "अाम्हा प्राणाहून प्रिय, छत्रपती शिवाजी महाराज" असे मराठी माणूस अभिमानाने बोलत असतो. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज होय.
गनिमी काव्याने प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची अतुलनीय कामगिरी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली आहे. हा इतिहास आहे. बलाढ्य विरोधकांना नामोहरण करण्यासाठी अफलातून गनिमी काव्या सारखा वापर केला गेला आहे. बुद्धीचातुर्याने व युद्धनीतीमध्ये नवीन कल्पना मांडून विरोधकांवर मात करून अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी हस्तगत केले. युद्धामध्ये अनेक सैनिकांचा नाहक प्राण जातो मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याद्वारे केलेल्या युद्धामुळे अत्यल्प सैनिकांना बलिदान द्यावे लागले. म्हणूनच युद्धनीतीमध्ये गनिमी कावा हे नवीन शास्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले आहे. महान शक्तिमान व बहुसंख्य युद्धसैनिक असण्यापेक्षा, अल्प सैनिक असले तरी बुद्धी चातुर्याने विरोधकांवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले तत्त्व आहे.
स्वराज्य निर्मितीसाठी बालवयामध्ये शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. आणि आपल्याच वयाचे सवंगडी स्वराज्य निर्मितीसाठी लढवय्ये म्हणून तयार केले. महाराष्ट्रातील तत्कालीन बाल व युवा मुलांच्यामध्ये स्वराज्य निर्मितीचे मंत्रांने स्पंदन पुलकित केली. कोणताही मागचा पुढचा विचार न करता, केवळ स्वराज्य निर्मिती करायचीच ! या ध्यासाने पछाडून व वेडापायी मराठी मुलखात स्वराज्य निर्मितीचे क्रांती सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा एक मावळा म्हणजे हजारो सैनिकाला भारी पडणारा युद्धसैनिक म्हणून अजरामर झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची ध्येयपूर्ती करण्यासाठी अनेक मावळे यांनी आपले बलिदान दिले आहे. स्वतः प्राणार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी अनेक मावळ्यांनी प्रयत्न केलेला इतिहास आहे. जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारे मावळे झालेले नाहीत. जगाच्या पोंशीद्यासाठी प्राण देणारे मावळे फक्त मराठी मातीतच जन्माला आलेले आहेत. मराठी मुलखातील सर्व जाती, धर्मातील मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबरोबर अखंडित राहिलेले आहेत.
मुस्लिम राजवटीत जनतेवर प्रचंड अन्याय केला जात होता. मंदिरांची नासधूस करणे, महिलांच्यावर अत्याचार करणे, असे अघोरी प्रकार होत होते. सामान्य रयतेची आर्थिक लूट केली जात होती. याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. महाराष्ट्र व देशातील मंदिरांचे पुनर्जीवन करणे, महिलांना संरक्षण देणे, त्यांची रक्षा करणे; आणि रयतेच्या साध्या काडीलाही हात लावला जाणार नाही याची दक्षता घेतली गेली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे जगभरात कौतुक होत आहे. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा करण्याची प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात होती. महिलांचा सन्मान केला जात होता. आदर्श राज्यकारभार कसा करावा ? यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती व नियमावली महत्त्वाची मानली जात आहे. प्रथम रयतहिताचे संरक्षण करणे, महिलांना आदरातिथ्य वागणूक देणे, प्रत्येक धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीला धर्मकांड करण्यास परवानगी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करून जो, राज्यकारभार केला. यापद्धतीचा राज्यकारभार जगांमध्ये कोणत्याही राज्याने केला नाही.
आज एकविसाव्या शतकातही हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्यकारभाराप्रमाणे हिंदुस्थानचे राजकारण केले जावे. अशी अपेक्षा शिवप्रेमी करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख झाला. तरी मराठी माणसाची छाती अभिमानाने व गर्वाने फुगत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीनुसार राज्यकारभार केला. तर हिंदुस्थान आणि महाराष्ट्रातील जनतेला सुख, समाधान मिळेल. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाने वाटचाल करावी लागेल. आणि त्यांच्या राजनीतीनुसार राज्य कारभार करावा लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा