कृष्णा’च्या विद्यार्थ्यांनी 6500 चौरस फूट लांब रिबन साकारून दिला कॅन्सर जागृतीचा संदेश कराड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; लिम्का बुक रेकॉर्डकडूनही नोंद
कराड - येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या प्रांगणात 6500 चौरस फूट लांबीची भव्य रिबन साकारली. या भव्य रिबनवर कृष्णा अभिमत विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, प्राध्यापक आणि कर्मचार्यांनी गुलाबी रंगात भिजवलेल्या आपल्या हातांचे ठसे उमटवून अनोख्या पद्धतीने कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला. पश्चिम महाराष्ट्रात कॅन्सर जागृतीसाठी अशाप्रकारे अभिनव पद्धतीने झालेल्या या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडूनही घेण्यात आली आहे.
मुंबई येथील ‘झुवियस लाईफसायन्सेस’च्या सहकार्याने ‘पिंक स्ट्रीट’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. भोसले यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा फौंडेशनच्या संचालिका सौ. गौरवी भोसले, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, निमीष ठक्कर आदी मान्यवरांनी स्वत: या रिबनवर गुलाबी हातांचे ठसे उमटवून या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी गुलाबी रंगात भिजवलेल्या आपल्या हातांचे ठसे उमटवून या उपक्रमात उर्त्स्फूत सहभाग नोंदविला.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन, जंक फूड, हॉट अॅन्ड स्पाईसी फूड, रेड मीट यासारख्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका संभवतो. तसेच पर्यावरणातील दुषित वातावरण, अन्नयुक्त पदार्थांवर फवारली जाणारी किटकनाशके यामुळेही कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनप्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. वेळीच निदान करून उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो. कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद गुडूर यांच्यासारखे अनेक निष्णात कॅन्सरतज्ज्ञ असून, कॅन्सरविषयक सर्वप्रकारच्या उपचारसुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सरला घाबरून न जाता संभाव्य लक्षणे जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत कॅन्सरबाबत जागृती संदेश देणार्या पोस्टर्सचे डिझाईन अणि टी शर्ट पेंटींग अशा स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांनाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोस्टर्स स्पर्धेमध्ये अनु तिवारी, अमित पाल व आकाश रेड्डी यांनी, तर टी शर्ट पेंटींग स्पर्धेत अमित पाल, ऋत्विका डागर व शीतल शेणॉय यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला कृष्णा अभिमत विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. अरूण रिसबुड, वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड, सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, एस. ए. माशाळकर, आर. के. साळुंखे आदी मान्यवरांसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आनंद गुडूर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. खुशबू भाटीया यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रश्मी गुडूर यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा