संतपरंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध - डॉ. सदानंद मोरे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृती जागृत - डॉ. सुरेश भोसले
कराड, ( लक्ष्मीपुत्र ) - संतपरंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध झाली असून, सर्वदूर पसरली आहे. संत हे आपले भाषिक पूर्वज असून, त्यांच्याशी आपले असणारे नाते हे भाषिक व सांस्कृतिक अंगाने जडलेले आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे थोर अभ्यासक, अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व तुकाराम महाराजाचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी केले. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, श्री मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती ह.भ.प. बाजीरावमामा कराडकर, वडगावच्या जयरामस्वामी मठाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठलस्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘संत आणि आपण’ या विषयावर विवेचन करताना डॉ. मोरे म्हणाले, की मराठी भाषेला संतांनी घडविले आहे. जे स्वत:ला मराठी भाषिक समजतात त्यांचे संतांशी नाते आपोआप जुळले जाते. संतांचा व आपला पारमार्थिक व आध्यात्मिक संबंध आहे. संतांनी चाललेल्या वाटेवरून चाललात तर आपली वाट सुकर आहे. आजच्या पिढीला प्रबोधनाची गरज असून, त्यांना संतांची शिकवण देणे आवश्यक आहे. आज आपण भाषिक व सांस्कृतिक संकटात असून, यातून मार्ग काढण्यासाठी संतांनी निर्माण केलेली भाषिक संपत्ती जोपासणे व त्यात सातत्याने वाढ करण्याची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. आपली आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकपर भाषणात डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्व. जयवंतराव भोसले सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराडमध्ये सातत्याने वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे यांचा डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा मदनराव मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जि. प. सदस्या सौ. प्रियांका ठावरे, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, सुजीत मोरे, संजय पाटील, अमोल गुरव, गिरीश पाटील, अॅड. बी. डी. पाटील, संग्राम पाटील, फारूक पटवेगार, आप्पासाहेब कदम, श्रीरंग देसाई यांच्यावर कराड व वाळवा तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा