कुस्तीमधून वयोमान टिकवणे शक्य ः हिंदकेसरी दिनानाथसिंह



कराड  -  आजच्या पिढीला मिळणाऱया आहारामध्ये सकसपणा कितपत आहे, हे ठाऊक नाही. असा सवाल करत कुस्ती ही आपली संस्कृती आहे. त्यामधूनच वयोमान टिकवणे शक्य आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दिनानाथसिंह यांनी व्यक्त केले. पंजाब व हरियानातील कुस्ती मल्लांना पद्यश्री मिळाले. पण यापासून महाराष्ट्राच्या मातीमधील मल्ल अद्याप दूरच राहीला आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

कापील (ता. कराड) येथील जेष्ठ नागरिक पैलवान जयवंतराव दाजी देशमुख यांचा सप्तनीक सत्कार तसेच गावामधील जेष्ठांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कराडचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर अध्यक्षस्थानी होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, शिवाजीराव पाचपुते, बापूसाहेब लोखंडे, दादासाहेब थोरात, रावसाहेब मगर, अतुल पवार, रामा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

दिनानाथसिंह म्हणाले, प्रत्येक गल्लीमध्ये तालिम जिवंत ठेवा. तरुणांच्या अंगाला लाल माती लागू द्या. सद्याच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या काहूरात आपण मुलांच्या संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करत आहोत. हे टाळण्यासाठी मुलांच्या वाढीकडे पालकांनी जबाबदारीने लक्ष द्यावे. तरुणांना आपल्या माता-भगिनींशी कसे वागावे हे कुस्तीतून शिकता येते. अतुल भोसले म्हणाले, कुस्ती व शेती क्षेत्रात जयवंतराव देशमुख यांनी केलेल्या कामगिरीची दखल कुटूंबियांनी घेतली. त्यांच्याकडील चांगल्या गुणांमुळे त्यांना गोतावळा निर्माण करता आला. कुस्ती मल्लांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करु. 

आप्पासाहेब कदम यांचेही भाषण झाले. विश्वनाथ देशमुख, आबासाहेब देशमुख व अशोकराव जाधव यांनी स्वागत केले. सुभाष जाधव व सुरेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वांगी अपघातामधील मल्लांच्या कुटूंबियांना देशमुख कुटूंबियांकडून पाच हजाराची मदत देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.